मुंबई | प्रतिनिधी - दक्षिण मुंबईत अनेक इमारती या इंग्रजांनी बांधल्या आहेत. या इमारतीला हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. या हेरिटेज इमारतीला शोभतील असे मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील दिव्यांचे खांब हेरिटेज अनुरुप केले जाणार आहेत. तसा निर्णय पालिकेने घेतला आहे. पथदिवे २२ आणि वाहतूक सिग्नलचे दहा खांब असे एकूण ३२ खांब आहेत. मात्र परिसर आकर्षक करण्याच्या दृष्टीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हेरिटेज अनुरुप खांब बसवले जाणार आहेत.
दक्षिण मुंबईतील दादाभाई नौरोजी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पश्चिम द्वारासमोरच्या मुख्य चौकात सध्या पथदिव्यांचे २२ खांब आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक सिग्नलचे १० खांब आहेत. यानुसार सध्या या परिसरात एकूण ३२ सामान्य प्रकारचे खांब अस्तित्वात आहेत. हे सर्व खांब आता हटविण्यात येणार असून त्यांच्या जागी हेरिटेज अनुरुप असे ९ खांब बसविण्यात येणार आहेत. या ९ खांबांपैकी ५ खांब हे पथदिव्यांचे असणार आहेत. त्यांची उंची ही प्रत्येकी ३९.३७ फूट एवढी असणार आहे. तर उर्वरित ४ खांब हे वाहतूक सिग्नलसाठी उपयोगात येणार आहेत. नवीन बसवण्यात येणारे सर्व हेरिटेज खांब हे 'माया डिजाईन' या प्रकारातले असणार आहेत. या सर्व खांबांना बाहेरुन व आतून गॅल्व्हनायजेशन केलेले असल्यामुळे तसेच वैशिष्ट्यपूर्ण रंग दिलेला असल्याने ते गंज रोधक असतील .निविदा तपशिलानुसार या खांबांचे अपेक्षित आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे असणार आहे. या खांबांचा रंग करडा असणार असून ते इटली येथून आयात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे पथदिव्यांच्या खांबांवर खालच्या बाजूला वाहतूक सिग्नल बसविण्याची देखील सुविधा असणार आहे, ज्यामुळे भविष्यात गरज भासल्यास वाहतूक सिग्नलसाठी नवीन खांब न बसविता देखील सिग्नलची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालयाजवळील चौकात बसविण्यात येणा-या हेरिटेज अनुरुप खांबांसाठी ९६ लाख रुपये खर्च अंदाजित असून मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.