मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला थंडा प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला थंडा प्रतिसाद

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेतील कर्मचारी, अधिका-यांना दिवाळी निमित्त 40 हजार रुपये बोनस मिळावा व कर्मचाऱ्यांच्या विविध मांगण्यासंदर्भात आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला कर्मचाऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिला. 17 वर्षानंतर पालिकेतील तब्बल 40 कामगार संघटना एकत्र आल्याने मोर्चाला कामगारांची संख्या मोठी असेल असे अंदाज बांधले जात असताना मोर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मैदानही कर्मचाऱ्यांनी भरले नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरु होती.

केंद्रातील आणि राज्यातील सरकार सातत्याने कामगार कायद्यांमध्ये एकतर्फी बदल करून कामगार विरोधी धोरण अवलंबत आहे. असेच धोरण पालिका प्रशासनानेही अवलंबले आहे. कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या बायोमॅट्रिकच्या हजेरीत सुधारणा करावी, कर्मचाऱ्यांसाठी विनाविलंब गटविमा सुरु करावा, वेतन व भत्ते सुधारावेत, कंत्राटीकरण, खासगीकरण आणि प्रशासनाचे मनमानी व आडमुठे धोरण सुधारावे, कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये बोनस देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी पालिकेतील 40 संघटनानी एकत्र येऊन मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला.

या मोर्चा दरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहता यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटी दरम्यान प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यामधील गेले 5 ते 6 वर्षे बंद झालेला संवाद पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी सुचवल्या प्रमाणे बोनसची मागणी वेगळी करून इतर मागण्यांसंदर्भात आयुक्त सांगतील त्या अधिकाऱ्यांशी बोलणी करण्याची तयारी समन्वय समितीची असल्याचे महाबळ शेट्टी, बाबा कदम, प्रकाश देवदास यांनी सांगितले आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना महापौर बोनस जाहीर करत असत. हि प्रथा प्रशासनाने बंद पाडली आहे. प्रशासन आपल्याला हवा तितकाच बोनस जाहीर करत असते. युनियनचा चर्चेमध्ये समावेशही करून घेतला जात नाही. यामुळे यावेळी युनियन आणि समन्वय समितीला बोनसच्या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. महापौरांशी झालेल्या भेटी दरम्यान महापौरांनी 7 ऑक्टोबरला बोनसबाबत गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. असे न होताबोनस बाबत वाटाघाटी कराव्यात अशी अपेक्षा समन्वय समितीने व्यक्त केली आहे. दरम्यान बोनस बाबत 9 ऑक्टोबर पर्यंत निर्णय जाहीर न केल्यास 10 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages