मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या आरोग्यविमा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. विमा योजनेची ३१ जुलैला मुदत संपल्याने ती नव्याने सुरु करण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतु, विमा कंपनीने सांगितलेली सुमारे १३५ कोटी रुपयाची रक्कम देण्यास पालिका तयार नसल्याने ही योजना लालफितीत अडकली आहे. यामुळे सुमारे सव्वा लाख कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वंचीत आहेत.
दोन वर्षापूर्वी विमा कंपनीकडून महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली. त्याचे तीन वर्षाचे कंत्राट व प्रत्येक वर्षी त्याचे नुतनीकरण करावे लागणार होते. दोन मुले व पत्नी यांना पाच लाखापर्यंत या योजनेचा फायदा घेता येतो. सुमारे एक लाख ४ हजार कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचा-यांनाही याचा लाभ मिळतो आहे. तीन वर्षाचे असलेले हे कंत्राटाचे प्रत्येकवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक होते. गेल्या जुलै २०१७ ला या योजनेचा कालावधी संपल्याने पुन्हा नुतनीकरण करण्यासाठी कंपनीने १३५ कोटी रुपये भरावे लागणार असल्याचे पालिकेला कळवले. पालिकेला मात्र ते मान्य नसल्याने त्यांनी केवळ ११६ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु, ही रक्कम तुटपूंजी असल्याचे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून ही योजना बंद झाली आहे. आता तीन महिन्यांनंतर पालिका प्रशासनाने नव्याने निविदा काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. नव्या निविदांसाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. अचानक काही आरोग्याची समस्या उद्भवल्यास मोठी रक्कम कशी जमा करावी असा प्रश्न पालिकेतील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.