मुंबई | प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन दलातील शिड्यांच्या देखभालीसाठी निविदा न मागवता मुंबई महापालिका ठेकेदाराला सहा लाख रुपये देणार आहेत. संबंधित कामाच्या निविदा मागविणे शक्य नसल्याने अट शिथिल करावी, असा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीपुढे मांडला आहे. बिना निविदा हा प्रस्ताव सादर करण्यात आल्याने याप्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईकारांवर आलेल्या प्रत्येक संकटात जीवाची बाजी लावून मदतकार्य करणार्या पालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणा आहेत. या यंत्रणांचे देखभाल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ४ एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, १ हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, २ टर्न टेबल शिडी वॉल्वो सांगाड्यावर तयार करण्यात आल्या आहेत. यांचे वार्षिक नियतकालीन देखभाल करण्यात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, संबंधित कंत्राट ३ लाख रुपयेहून अधिक असल्याने कोणत्याही निविदा न मागता मे. व्ही. ई. कमर्शिअल व्हेईकल्स लि. या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. हे काम देताना संबंधित ठेकेदारांकडून अंदाजपत्रक मागविण्यात आले आहे. यात सर्व करांसह ६ लाख १२ हजार ५५३. ७४ रुपये देखभाल खर्च येणार आहे. त्यामुळे संबंधित अट स्थायी समितीने शिथिल करावी, असा प्रस्ताव समितीच्या पटलावर पालिकेने मंजुरीसाठी ठेवला आहे.