पालिका पुढील वर्षी १८ हजार ८१८ शौचकूप बांधणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका पुढील वर्षी १८ हजार ८१८ शौचकूप बांधणार

Share This

३७६ कोटींचा खर्च अपेक्षित - 
मुंबई | प्रतिनिधी 15 Nov 2017 -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अधिकाधिक शौचालये उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या नव्या वर्षात म्हणजेच सन २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात १८ हजार ८१८ शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यामध्ये अनेक एकमजली शौचालयांसह दुमजली व तीनमजली शौचालयांचे बांधकाम देखील करण्यात येणार असून याकरिता साधारणपणे ३७६ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन येत्या १५ जानेवारी २०१८ पर्यंत कार्यादेश (Work Order) देण्याचे आदेश प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करताना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

या शौचालय बांधकामांमध्ये नव्याने बांधण्यात येणा-या शौचालयांसोबतच धोकादायक परिस्थितीत असणारी शौचालये तोडून त्याठिकाणी पुनर्बांधकाम करण्यात येणा-या शौचालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम करताना नवीन व सुधारित आरेखनांचा (Design) वापर करण्यात येणार असल्याने जुन्या ११ हजार १७० शौचकुपांच्याच जागेत १५ हजार ७७४ शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांना जुन्या शौचालयांच्या जागेत अतिरिक्त ४ हजार ६०४ शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त ३ हजार ४४ शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत.

महापालिकेद्वारे गेल्या सुमारे २० वर्षात बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली शौचालये आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन आता शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.तसेच यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे.त्याचबरोबर या शौचालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावरच सुयोग्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages