प्रस्तावित बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे निषेध आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रस्तावित बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे निषेध आंदोलन

Share This

मुंबई । प्रतिनिधी 15 Nov 2017 -
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या आर्थिक बेशिस्तीमुळे गाळात रुतलेल्या बेस्ट उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रवासी दरवाढ प्रस्तावित केल्याच्या निषेधार्थ मुंबई विभागीय राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्यावतीने अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. 

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून गणल्या गेलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमास मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मुंबईकरांसाठी अत्यावश्यक सेवा असलेला हा उपक्रम सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे गेली काही वर्षे तोट्यात चालला आहे. मात्र हा तोटा भरून काढण्यासाठीच्या प्रशासकीय स्तरावरील उपाययोजना करण्याऐवजी सर्वसामान्य मुंबईकरांकडून ही तूट भरून काढण्याचा बेस्ट प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निर्णय निषेधार्ह आहे. महागाईने अगोदरच त्रस्त असलेल्या प्रवाशांच्या खिशाला चाट लावणारा आहे असल्याचे सचिन अहिर म्हणाले.

महापालिकेच्या तब्बल साठ हजारापेक्षा अधिकच्या मुदत ठेवी विविध वित्त संस्थांमध्ये असतानाही त्यांना हात न लावता सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम सत्ताधारी आणि बेस्ट प्रशासन करत असल्याचा आरोप अहिर यांनी केला. बेस्टचा ९०० कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी २००० कोटींच्या अर्थसहाय्याची गरज आहे. महापालिकेने ही रक्कम देणे अपेक्षीत असतानाही त्याकडे प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन प्रवासी बेस्टकडे पाठ फिरवतील अशी भीतीही अहिर यांनी व्यक्त केली. टॅक्सी, रिक्षा आणि खाजगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडणारे निर्णय घेऊन भविष्यात बेस्टची सेवा पुर्णत: बंद करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या आंदोलनादरम्यान बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांची भेट घेऊन प्रस्तावित भाडेवाढ रद्द करून बेस्टला पुन्हा नफ्यात आणण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सचिन अहिर यांच्यासह मुंबई उपाध्यक्ष अशोक धात्रक, जिल्हाध्यक्ष बबन कनावजे, रमेश परब, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष ॲड. निलेश भोसले तसेच तालुकाध्यक्षांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages