पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान

Share This

मुंबई । प्रतिनिधी 7 Nov 2017 -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि प्रभाग क्रमांक 62 मधील चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरल्याने त्यांना अपात्र केल्याने या दोन्ही प्रभागातील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.

मुंबई दहिसरच्या प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि माजी महापौर शैलजा गिरकर यांचे 11 सप्टेंबर 2017 रोजी दुःखद निधन झाले होते. तसेच अंधेरी जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक 62 मधील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. सदर दोन्ही रिक्त झालेल्या जागेवर 13 डिसेंबर 2017 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. यावेळी सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 20 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी 28 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक चिन्हांचे वाटप 2 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.

शैलजा गिरकर यांना फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 15344 मते मिळाली होती. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसनेच्या जयश्री मिस्त्री यांचा 10344 मतांनी पराभव केला होता. याठिकाणी गिरकर यांच्या कार्याचा आणि सहानुभूतीचा फायदा भाजपाला होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 62 मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले चंगेज मुलतानी यांना विक्रमी 10659 मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांचा सुमारे 5500  मतांनी पराभव केला होता. मात्र मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरल्यावर राजू पेडणेकर यांनी दुसर्या क्रमांकावर असल्याने आपल्याला नगरसेवकपद द्यावे अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. तसेच राजू पेडणेकर यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याचे खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या प्रभागात पोट निवडणूक जाहीर केल्याने शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात पुन्हा शिवसेना आणि भाजपात पुन्हा संख्याबळावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages