पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी लवकरच बैठक - दीपक केसरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी लवकरच बैठक - दीपक केसरकर

Share This

मुंबई 13 Nov 2017 - 
सांगलीतील अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत योग्य प्रकारे सुरू आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी लवकरच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मृत अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांना मदत म्हणून दहा लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.

केसरकर म्हणाले की, सांगलीमध्ये पोलीस कोठडीमध्ये अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत सुरू करण्यात आली असून यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह इतर आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेनंतर मी स्वतः सांगली येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच मृत कोथळे यांच्या कुटुंबियांनाही जाऊन भेटलो. कोथळे कुटुंबीय व या प्रकरणातील दुसऱ्या परिवारास पोलीस संरक्षण पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची कोथळे कुटुंबियांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस कोठडीतील मृत्यू होऊ नयेत, यासाठी आपण लवकरच पोलीस अधिकारी व गृह विभागाची बैठक घेणार आहोत. यासंबंधी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, यासाठी यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा एकदा काढण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. सांगलीतील प्रकरणाची सखोल माहिती घेतली असून यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यवाहीचा आढावा सात दिवसानंतर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages