दोन दिवसापूर्वी मुंबईतील कुपरेज मैदानात घोडेस्वारी करताना सहा वर्षीय जान्हवी शर्माचा मृत्यू झाला होता. या चिमुकलीच्या मृत्यूनंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एका लहान मुलीच्या मृत्यूनंतर या उद्यानात घोडेस्वारीला बंदी असल्याची आठवण पालिकेला झाली आहे. प्रशासनाने या संदर्भात उद्यानाची देखभाल करणार्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.
प्राणी अत्याचारविरोधी कायद्यानुसार 2015 मध्ये उच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या घोडेस्वारीला बंदी घातली आहे. न्यायालयाचे आदेश असतानाही पालिकेच्या आशिर्वादाने मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे घोडेस्वारी सुरू आहे. घोडेस्वारीवर बंदी घालण्याचे आदेश देणाऱ्या व या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कूपरेज मैदानात या चिमुकलीचा रविवारी सहा वर्षीय जान्हवी शर्माचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. जान्हवीच्या मृत्यूनंतर बेकायदेशीर घोडेस्वारीचा आणि त्यावरील बंदीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या "ए" वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित उद्यानात 2015 मध्ये घोडेस्वारीला बंदी असल्याबाबतची नोटीस लावण्यात आली होती. मात्र ही नोटीस बेकायदा घोडेस्वारीचा व्यवसाय करणार्यांनी फाडून टाकली. त्यामुळे संबंधित उद्यानाच्या देखभालीचे काम पाहणार्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच यापुढे घोडेस्वारीला बंदी घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.
