
लाभार्थ्याला १४५१ व प्रेरणा देणाऱयाला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम -
मुंबई । प्रतिनिधी 22 Nov - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१७ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. बिनटाक्याची पुरुष नसबंदी ही सुरक्षित, साधी, कमी वेळेत होणारी शस्त्रक्रीया असून ही शस्त्रक्रीया अंगिय बधिकरण करुन ५ ते १० मिनिटात करण्यात येते. ती बिनटाक्याची आणि कटरहीत आहे. सदर शस्त्रक्रीया ही कोणत्याही गुंतागुंतीशिवाय होते.शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्वरीत एका तासात घरी जाऊ शकतो. सदर शस्त्रक्रीयेस पात्र असणाऱया पुरुषांनी या सोप्या पद्धतीचा फायदा घ्यावा. जोडीदारापैकी कोणीही संततिप्रतिबंधक साधन वापरण्यासंबंधी काळजी करु नये आणि गर्भधारणा होण्याची भिती न ठेवता वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यावा. शस्त्रक्रीया करणाऱया लाभार्थ्याला १४५१ रुपये व प्रेरणा देणाऱयाला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम दिल्या जातात. कुटुंबकल्याणासाठी तसेच छोटे आणि सुखी कुटुंबासाठी जास्तीत जास्त पुरुषांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
पुरुष नसंबदी शस्त्रक्रीयेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, के.ई.एम., नायर, जे.जे. ही मोठी रुग्णालये व वांद्रे (पश्चिम) येथील भाभा रुग्णालय, सांताक्रुझ (पूर्व) येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालय, कस्तुरबा क्रॉस रोड, गोरेगांव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालय, मालाड (पूर्व) येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय व एस. के. पाटील रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथील शताब्दी रुग्णालय, बोरिवली (पश्चिम) येथील भगवती रुग्णालय, कुर्ला (पश्चिम) येथील भाभा रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, चेंबूर येथील माँ रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, बर्वे नगर घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालय, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, मुलुंड (पूर्व) येथील मुलुंड सर्वसाधारण रुग्णालय आणि मुलुंड (पश्चिम) येथील एम. टी. अगरवाल ही सर्व उपनगरीय रुग्णालये तसेच झावबावाडी, माहीम, प्रभादेवी, रावळी कॅम्प, नायगांव, आकुर्ली, चारकोप, चोक्सी, गोरेगांव,शिरोडकर, खेरवाडी, मालवणी, मरोळ, स्कवॉटर्स वसतिगृह, ओशिवरा, बोरीवली, चेंबूर, चुनाभट्टी, रमाबाई ठाकरे, भांडुप, टागोरनगर, देवनार, चिताकॅम्प, मुलुंड, रिद्धी उद्यान, न्यू भांडुप, बैलबाजार आणि माता बाल कल्याण या प्रसुतिगृहांशी संपर्क साधावा, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने कळविले आहे. पुरुष नसबंदीची सेवा एफ/दक्षिण, कुटुंब कल्याण रुग्णालय परळ, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई येथे दररोज सकाळी १०.३० ते दुपारी ३ पर्यंत उपलब्ध आहे.