शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे माझे वडील - राज कोरडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे माझे वडील - राज कोरडे

Share This

डीएनए चाचणीसाठी न्यायालयात याचिका -
मुंबई । प्रतिनिधी 6 Nov 2017 -
शिवसेनेचे मागठाणेमधील आमदार प्रकाश सुर्वे हे माझे वडील असल्याचा दावा करत एका मुलाने डीएनए चाचणीसाठी आईसह मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज कोरडे असे या युवकाचे नाव आहे. आपण डीएनए चाचणीसाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आमदार सुर्वे यांच्या साथीदारांनी आपले अपहरण करुन सुरतला नेले. तेथे डोक्याला रिव्हॉल्वर लावून याचिका मागे घेण्यासाठी धमकावले. इतकेच नाहीतर याचिका मागे घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस कोंडून माझा शारीरिक व मानसिक छळ केला, असा आरोप राज कोरडे याने पत्रकार परिषदेत केला आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या सुर्वे यांच्या विरोधात गंभीर आरोप झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोरडे आणि त्याच्या आईने गेल्या वीस वर्षांपासून आमदार सुर्वे व त्यांचे साथीदार आपला मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. कोणाचीही साथ नसल्यामुळे आपण त्यांच्याविरोधात कुठेच तक्रार करू शकलो नाही, असे सांगताच राज यांच्या मातोश्री उज्ज्वला यांच्या भावनांचा बांध फुटला. राज आपला पिता सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहे. तर आई उज्ज्वला त्याच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. राजला सुर्वे यांनी स्वीकारावे, यासाठी त्या गेल्या वीस वर्षांपासून विनंती करत आहेत. अखेरीस सुर्वे आईची विनंती सतत धुडकावत असल्याचे पाहून वयाच्या एकविसाव्या वर्षी राजने 16 ऑक्टोबर रोजी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रकाश सुर्वे यांच्यासोबत 1989 मध्ये वज्रेश्‍वरी येथील मंदिरामध्ये लग्न केले होते. सुर्वे यांनीच मूल होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर 1993 मध्ये राज याचा जन्म झाला. पण सुर्वे यांनी माझा स्वीकार न करता दुसरे लग्न केले. त्या वेळी मूल लहान असल्याने त्यांच्याशी लढण्यासाठी मी समर्थ नव्हते. मुलगा सतत माझ्याकडे त्याच्या जन्मदात्याविषयी विचारू लागल्यामुळे सुर्वे हे त्याचे पिता असल्याचे त्याला अठराव्या वर्षी सांगितले. आम्हाला प्रकाश सुर्वे यांची संपत्ती नको,पण सुर्वे यांनी किमान माझ्या मुलाला स्वीकारून त्यांचे नाव द्यावे, एवढीच मागणी असल्याचे उज्ज्वला कोरडे यांनी स्पष्ट केले. आमदार सुर्वे यांना मुलगा झाल्यावर त्यांनीही आपल्या मुलाचे नाव राज ठेवले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज यानेही आपल्यावरील अन्यायाला वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, प्रकाश सुर्वे यांनी बोरिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात माझ्या प्रवेशासाठी डोनेशन दिले आहे. इतकेच नाहीतर शैक्षणिक शुल्कसुध्दा त्यांनीच अदा केले आहे. पण आता ते मला नाकारत आहेत. डीएनएसाठी याचिका दाखल केल्यानंतर सुर्वे यांच्या सांगण्यावरून गणेश नायडू या त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांच्या साथीदारांसोबत माझे सुरतला अपहरण केले. तेथे माझे एका नर्सने तपासणीसाठी रक्त काढून घेतले. तपासणीमध्ये सुर्वेेंशी माझा डीएनए जुळत असल्याचे पाहूनच ते आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप राज याने केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages