अनुसूचित जाती वस्त्यांच्या विकासासाठी आराखडा सादर करा - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनुसूचित जाती वस्त्यांच्या विकासासाठी आराखडा सादर करा - राजकुमार बडोले

Share This

मुंबई 21 Nov 2017 - अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी व प्रादेशिक अधिकारी, नेमण्यात आलेले वास्तुविशारद यांनी त्यांच्या क्षेत्रातील वस्त्यांचा संपूर्ण विकास आराखडा एक महिन्यात सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा सर्वंकष विकास करण्याची योजना घेण्यात आली होती. या संदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार डॉ. सुरेश खाडे, नारायण कुचे, दीपक चव्हाण, संजय सावकारे, डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, राज्यभरातील सहायक आयुक्त, प्रादेशिक समाज कल्याण अधिकारी, मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्व विभागातील वस्त्यांच्या विकासाबाबतच्या कामकाजाचा आढावा घेऊन सामाजिक न्यायमंत्री बडोले पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा सर्वंकष विकासाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करायचे असल्याने वस्त्यांच्या विकासाचा सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने आराखडा तयार करणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात वस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यास अडचणी येत असल्यास खासगी संस्थेमार्फत आराखडा तयार करण्याबाबत संबंधित सहायक आयुक्तांनी प्रस्तावित करावे. या कामासाठी विना मोबदला आराखडा देण्याबाबत स्वयंसेवी संस्थांना आवाहन करावे, तसेच या वस्त्यांमध्ये सोलर लाईट उपलब्ध करुन देण्याबाबत महाऊर्जा (मेडा) यांनी अहवाल द्यावा, अशा सूचनाही बडोले यांनी यावेळी दिल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages