बेस्ट ग्राहकांना स्वस्त विजेसाठीच ओपन टेंडर - बेस्ट महाव्यवस्थापक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट ग्राहकांना स्वस्त विजेसाठीच ओपन टेंडर - बेस्ट महाव्यवस्थापक

Share This

मुंबई । प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाला टाटा वीज कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. यासाठी बेस्ट आणि टाटा मध्ये ९३२ मेगा वॅटचा विद्युत करार केला आहे. हा करार ३१ मार्च २०१८ रोजी संपत असल्याने यापुढे कोणत्या कंपनीकडून वीज घेऊन ग्राहकांना पुरवण्यात येणार असा प्रश्न बेस्ट समितीपुढे उपस्थित झाला असता ग्राहकांना स्वस्त दरात वीज पुरवठा करता यावा म्हणून ओपन टेंडर काढले जाईल अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली.

बेस्ट उपक्रम टाटा कंपनीकडून वीज घेऊन आपल्या ग्राहकांना वीज पुरवठा करते. टाटा कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून वीज पुरवठा केला जात आहे. मात्र टाटा कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठीच टेंडर काढले आहे का ? टाटाला निविदा प्रक्रियेतून बाहेर ठेवून रिलायंस आणि अदाणी कंपनीकडून वीज घ्यायची आहे का ? टाटा बरोबर केलेला करार येत्या ३१ मार्च २०१८ ला संपणार आहे. निविदा प्रकियेतून टाटाला बाहेर ठेवल्यास १ एप्रिल पासून मुंबईकर नागरिकांना वीज कशी मिळणार ? असे अनेक प्रश्न बेस्ट समितीत उपस्थित करण्यात आला.

यावर बेस्टचे महाव्यस्थापक सुरेंद्र बागडे यांनी स्पष्टीकरण देताना ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध व्हावी म्हणूनच ओपन टेंडर काढून वीजखरेदी करण्यात येणार आहे. मुंबईला ३५०० ते ३६०० मेगावॅट विजेची गरज आहे. त्यापैकी २००० मेगावॅट वीज मुंबई बाहेरून विकत घेतली जाते. ती वीज मुंबईच्या हद्दीपर्यंत आणण्याचे काम संबंधित कंपनी करते त्यानंतर मात्र शहरात बेस्टकडून हि वीज इतर ठिकाणी पुरवली जाते. यामुळे जी कंपनी दारापर्यंत वीज आणून देते आणि ज्याचे दर कमी असतील अश्या कंपनीला वीज पुरवठा करण्याचे काम दिले जाईल असे सांगितले.

मुंबईकर नागरिकांना स्वस्त वीज मिळावी म्हणून मार्केट मधून ७५० मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यात टेंडर काढण्यात आले आहे. टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनी लि. आणि टाटा पॉवर कंपनी लि. या दोन कंपन्यांनी प्रत्येकी २५० मेगावॉट आणि १५० मेगावॉट विजेसाठी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र बेस्टने निविदेसाठी केलेल्या नियमानुसार एकाच व्याक्तीचे एका कंपनीत ५० टक्क्याहून अधिक मालकी असल्यास त्या कंपनीला टेंडर प्रक्रियेतून बाद करण्याच्या नियमामुळे टाटाला निविदा प्रकियेत सहभाग घेता येणार नसल्याचे कळविले आहे. मात्र टाटा पॉवरने बेस्टमार्फत सुरू झालेल्या २५० मेगावॉट स्पर्धात्मक वीज खरेदीच्या ई-निविदा प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे केली होती. यामुळे पुढील करार होई पर्यंत सहा महिने टाटाकडून वीज घेण्यासाठी नियामक आयोगापुढे प्रस्ताव सादर करणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages