Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्टने वीज निर्मिती करून मेट्रो, मोनो रेल्वेला पुरवावी - रमेश कोरगावकर


मुंबई | प्रतिनिधी - आर्थिक घाट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाने उत्पन्न वाढीसाठी वीज चोरी रोखावी, खाजगी वाहनांद्वारे चालणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखावी, थकबाकी वसूल करावी तसेच पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, कचऱ्यापासून वीज निर्मिती करून मुंबईतील उंच इमारती, मेट्रो व मोनो रेल्वेंना वीज पुरवठा करावा, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी केली. स्थायी समितीत बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पावरील भाषणावेळी कोरगावकर बोलत होते.

बेस्ट उपक्रमाच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी भाषणापासून चर्चेला आजपासून सुरुवात झाली. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने वीज निर्मिती क्षेत्रात पाय रोवण्याबाबत आपले ध्येय निश्चित करायला हवे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा, तसेच वीज निर्मितीसाठी बेस्टला एखादा भूखंड उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी सूचना करताना वीज निर्मितीत बेस्टने पुढाकार घेवून ती मेट्रो, मोनो रेल्वेला पुरविण्याची तयारी करावी, असे उपाय कोरगावकर यांनी बेस्टला सुचविले आहेत.

मुंबईतील वसंतराव नाईक (पूर्व द्रुतगती )महामार्ग -राणी लक्ष्मीबाई चौक (ठाणे -सायन), सर अलियावर जंग (पश्चि द्रुतगती) महामार्ग - कला नगर ते अंधेरी, आदी शंकराचार्य मार्ग (जोगेश्वरी - विक्रोळी जोडमार्ग) - गांधीनगर ते पवई, जिजामाता भोसले मार्ग (घाटकोपर - विक्रोळी जोडमार्ग), खान अब्दुल गफार खान मार्ग - लाला बहादूर शास्त्री मार्ग - संत रोहिदास मार्ग ( वांद्रे -कुर्ला संकुल - सायन - वांद्रे ) या पाच रस्त्यांवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत "स्वतंत्र बस मार्गिका" कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोरगावकर यांनी भाषणांतून दिली. तसेच बस थांब्यावर होणारी अतिक्रमणे हटवली जावीत, एसी बसगाड्यांमध्ये आवश्यक बदल करून त्या पुन्हा प्रवाशांसाठी सुरू कराव्यात, बेस्टवर कर्ज व तोटा यांच्यामुळे जो ३५८६ कोटींचा आर्थिक बोजा आहे तो कमी करण्यासाठी महापालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, खाजगी कंपन्यांसाठी बेस्टने आपल्या बसगाड्या उपलब्ध करून त्याद्वारे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावेत अश्या सूचना कोरगावकर यांनी केल्या. राज्य शासनाने एसटी महामंडळाप्रमाणेच बेस्टलाही आर्थिक मदत करावी अशी मागणी कोरगावकर यांनी यावेळी केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom