रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांवरील पालिका कारवाई करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांवरील पालिका कारवाई करणार

Share This
मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते, पदपथ वा सार्वजनिक जागेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे (Abandoned Vehicle) वाहतूकीचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच अशा वाहनांमध्ये जमा होणा-या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्याची देखील संभाव्यता असते. यामुळे अशी सोडून दिलेली वाहने महापालिकेद्वारे उचलण्यात येतात व नंतर त्यांचा लिलाव केला जातो. या प्रकारची कारवाई करण्यासाठी आतापर्यंत वाहने उचलण्यासाठी आवश्यक असणारे वाहन (टोइंग व्हॅन) शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एकाच ठिकाणी उपलब्ध असायचे. ज्यामुळे वाहन उचलून नेण्याची कार्यवाहीवर मर्यादा येत असत. हे लक्षात घेऊन आता महापालिकेने यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती तयार केली आहे. तसेच महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांच्या स्तरावर 'टोइंग व्हॅन' उपलब्ध करण्याची काळजी घेतली जात असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे देण्यात आली आहे. 

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील विविध तरतूदींनुसार महापालिका क्षेत्रात सोडून देण्यात आलेल्या वाहनांना नोटीस देणे, वाहन उचलणे, जप्त करणे आदी कारवाई केली जाते. ही कारवाई नियमितपणे व सुयोग्य समन्वयासह व्हावी, यासाठी आता अतिक्रमण निर्मूलन खात्याने सुनिश्चित कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धती अंतर्गत विभागातील विभाग क्षेत्रात सोडून दिलेल्या वाहनांचे नियमितपणे सर्वेक्षण परिरक्षण खात्यातील अभियंत्यांमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात जी वाहने आढळून येतील अशा वाहनांवर महापालिका अधिनियमानुसार नोटीस चिकटवण्यात येईल. त्यानंतर त्यापुढच्या ४८ तासांमध्ये सदर वाहन संबंधितांनी उचलून नेले नाही, तर ते वाहन महापालिकेद्वारे उचलून महापालिकेच्या 'गोडाऊन' मध्ये जमा केले जाणार आहे.

यापूर्वी वाहन उचलण्यासाठी केवळ ६ वाहने उपलब्ध होती. ज्यामुळे वाहन उचलण्यासाठी विलंब होण्याची शक्यता असायची. मात्र, आता यासाठी १० टोइंग वाहने असणार आहेत. यापैकी ७ वाहने ही महापालिकेच्या ७ परिमंडळांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच परिमंडळ २, ४ आणि ५ या तीन परिमंडळांची गरज लक्षात घेऊन तेथे प्रत्येकी १ अतिरिक्त वाहन असणार आहे. टोइंग व्हॅनची संख्या वाढल्यामुळे आणि परिमंडळीय स्तरावर टोइंग व्हॅन उपलब्ध झाल्यामुळे सोडून दिलेले वाहन उचलण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. 'सोडून दिलेले वाहन' महापालिकेने उचलून नेल्यानंतर त्यापुढील ३० दिवसांपर्यंत संबंधितांना दंड भरुन वाहन सोडवून नेता येणार आहे. मात्र, ३० दिवसांच्या कालावधी दरम्यान वाहन सोडवून न नेल्यास त्या वाहनाचा महापालिकेद्वारे लिलाव केला जाणार आहे.

२०१७ मध्ये मार्च महिन्यात २ हजार २३१ वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. या पोटी महापालिकेला ४१ लाख ३२ हजार रुपये महसूल मिळाले होते. तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या २ हजार ७४७ वाहनांच्या लिलावातून महापालिकेला ९५ लाख ९६ हजार रुपये मिळाले होते. पूर्वीच्या लिलांवांमध्ये प्रतिसाद न मिळालेल्या वाहनांचा पुढच्या लिलावामध्ये समावेश करण्यात येतो. त्यानुसार या लिलावामध्ये देखील पूर्वी उचलण्यात आलेल्या वाहनांचा समावेश होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत उचलण्यात आलेल्या २ हजार २३५ वाहनांपैकी ३४६ वाहने संबंधितांनी दंड भरुन सोडवून नेली होती. या पोटी महापालिकेला ३० लाख ९६ हजार रुपये एवढा महसूल प्राप्त झाला होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत साधारणपणे रुपये १ कोटी ६८ लाख २४ हजार एवढी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. आपल्या परिसरात एखादे सोडून दिलेले वाहन आढळल्यास त्याविषयीची तक्रार महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा महापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages