देवनार डम्पिंगवरील सीसीटीव्ही बंद - डम्पिंगची सुरक्षा वाऱ्यावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनार डम्पिंगवरील सीसीटीव्ही बंद - डम्पिंगची सुरक्षा वाऱ्यावर

Share This

मुंबई । प्रतिनिधी - देवनार येथील डम्पिंगवर सुरक्षेसाठी खासगी संस्थेद्वारे लावलेले सीसीटीव्ही बंद आहेत. सीसीटीव्ही बंद असल्याने येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समितीत केला. देवनार डम्पिंगवरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. काही ठिकाणी केवळ खांब उभे आहेत. क्षेपणभूमीवरील सुरक्षेबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळावेत, यासाठी गेल्या चार महिन्यापासून पाठपुरावा सुरु आहे. परंतु, प्रशासनाकडून चालढकलपणा केला जातो. यामुळे येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा गंभीर आरोप सपाचे पालिका गटनेते रईस शेख यांनी केला. तसेच येथे सक्षम सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची मागणी केली.

देवनार क्षेपणभूमी येथे देखरेखीसाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मे. सोहम गौरव सिस्टीम या खासगी संस्थेला दोन वर्षाकरिता भाडेतत्वावर कंत्राट दिले. १ कोटी ४१ लाख ७८ हजार २७८ हजार रुपये यावर खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. सदस्यांनी यावर आक्षेप घेत, क्षेपणभूमीवरील सुरक्षेबाबत आरोप केला. कंत्राटदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन भाड्याने सीसीटीव्ही बसविण्याएेवजी पालिकेने स्वतः कायस्वरुपी सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी. तसेच कंत्राटदारांला वर्षभरासाठी किती रुपये भाडे दिले गेले, याबाबत खुलासा करावा अशी मागणी मनोज कोटक, मंगेश सातमकर या नगरसेवकांनी लावून धरली. महापालिकेने यापुढे कंत्राटदारांकडून सीसीटीव्ही कॅमेरे न घेता, स्वखर्चाने कॅमेरे लावावेत, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी केली. दरम्यान, कायमस्वरुपी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास पालिका सकारात्मक आहे. यापुढे खासगी संस्थांना सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीचे काम दिले जाणार नाही, असे स्पष्टीकरण पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी समितीत दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages