लाखो भीम अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाखो भीम अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
ओखी वादळाच्या निमित्ताने दोन दिवस पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी जनता येईल का असे प्रश्न उपस्थित केले जात असताना महापरिनिर्वाण दिनाला मात्र आंबेडकरी अनुयायांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून बाबासाहेबाना अभिवादन केले आहे. वादळ येवो किंवा कोणत्याही अडचणी आल्या असत्या तरी आम्ही आमच्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला येणारच अशी प्रतिक्रिया अनुयायांनी दिल्या आहेत. दरम्यान चैत्यभूमीवर महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबईकरांच्या वतीने महापौर विश्वनाथ महाडेश्‍वर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी बाबासाहेबाना अभिवादन करण्यास दादर चैत्यभूमी येते येत असतात. यावर्षी सोमवारी ४ डिसेंबर पासून मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु झाला होता. पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाला होता. भीम अनुयायांना राहण्यासाठी बनवण्यात आलेला मंडप कोसळून तीन जन जखमी झाले. शिवाजी पार्कमध्ये राहण्यास जागा नसल्याने महापालिकने मुंबईमधील ७० शाळांमध्ये अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास येत होती. शिवाजी पार्क मधील मैदानात चिखल झाल्याने मुंबईमधील शाळांमध्ये व बुद्धविहारांमध्ये आश्रय घेतलेले अनुयायांना पुन्हा चैत्यभूमीवर येण्यास वाहनांची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत होती.

महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने पुस्तक आणि साहित्य विक्रेते शिवाजी पार्क मध्ये आपले स्टॉल लावतात. अश्या स्टॉलचा ५ ते ७ डिसेंबर या तीन दिवसात लाखोंचा धंदा होत असतो. यावर्षी मात्र शिवाजी पार्क परिसरात चिखल असल्याने फारच कमी प्रमाणात स्टॉल लावण्यात आले होते. शिवाजी पार्कमध्ये अनुयायायी जास्त प्रमाणात येत नसल्याने अनेक पुस्तक आणि साहित्य विक्रेत्यांनी आपले स्टॉल शिवाजी पार्कच्या बाजूच्या फुटपाथ वर आणि पेट्रोल पंपाजवळ लावले होते. तरीही दरवर्षी प्रमाणे यावर्षी विक्री झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शिवाजी पार्कमध्ये सालाबाद प्रमाणे सरकारी कंपन्यांचे व सेवाभावी संस्थांचे अल्पोपहार, भोजनदान, चहा वाटपाचे स्टॉल दरवर्षी प्रमाणे लावण्यात आले होते. मात्र याठिकाणी चिखल असल्याने फारच कमी प्रमाणात अनुयायी या स्टॉलला भेटी देत होते. सकाळी चैत्यभूमीवर दादरच्‍या कमला मेहता अंध शाळेची विद्यार्थीनी आरती राठोड हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनावर मनोगत व्‍यक्त केले. त्‍यानंतर याच शाळेतील अंध मुलींना दिशादर्शक किटचे वितरण तसेच भिख्‍खू बांधवांना चिवर दान मुख्यमंत्री व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

मान्यवरांनी केले अभिवादन -
राज्‍यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार भाई गिरकर, आमदार शरद रणपिसे, आमदार अबू आझमी, महापौर विश्वनाथ महाडेश्‍वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, विरोधी पक्ष नेते रवी राजा, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, एस आणि टी प्रभाग समिती अध्‍यक्षा समिता कांबळे, पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जऱहाड, संजय निरुपम, राजू वाघमारे, माजी मंत्री चंद्र्कांत हंडोरे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages