Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

इंदु मिलच्या नावाने युती सरकार फक्त राजकारण करते आहे - सचिन अहिर


मुंबई | प्रतिनिधी -
इंदु मिलच्या नावाने शिवसेना भाजप युतीचे सरकार फक्त राजकारण करत असून या जागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भुमिपुजन होऊन तब्बल दोन वर्षे उलटून गेली, तरीही अजून स्मारकाची एक वीटही रचली गेलेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. अहिर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. तसेच अोखी चक्रिवादळाची पुर्वकल्पना असतानाही प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने लाखो भीमसैनिकांना हकनाक झालेल्या त्रासाबद्दल मुंबई महापालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दादरच्या इंदु मिल परिसरात डॉ. आंबेडकरांचे भव्य दिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांची इच्छा आहे. या स्मारकाकडे अवघ्या देशभरातील जनता डोळे लावून बसलेली असताना, केंद्र आणि राज्य सरकार मात्र त्यांच्या भावनांशी खेळ करत आहे. सरकार स्मारकाच्या मुद्द्याचा निव्वळ राजकारणासाठी वापर करून हे सरकार आता स्वस्थ बसून राहिल्याची टीका अहिर यांनी यावेळी केली. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनापुर्वी काहीतरी थातूरमातूर कारणे सांगून सरकार वेळ मारून नेत अाहे. गेल्या वर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या चार दिवस अगोदर इंदु मिलमध्ये एमएमआरडीएच्या वतीने पाडकामाला सुरूवात केल्याचा दिखावा करण्यात आला. तेव्हा भाजपच्या काही स्वयंघोषित आणि अतिउत्साही नेत्यांनी या ठिकाणी येऊन स्मारकाचे काम सुरू झाल्याचा दावाही केला होता. यंदाही महिन्याभरात स्मारकाच्या कामाला सुरूवात होईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता तारखा देण्याव्यतिरिक्त या सरकारने काहीच केलेले नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे जनतेच्या भावनांशी उगाच खेळ करत या मुद्द्यावर लोकांना आश्वासने देत राजकारण करण्यापेक्षा सरकारने स्मारक उभारण्यासाठी खरोखरच काहीतरी हालचाली कराव्यात असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या वेळी त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनिल शिंदे, राम भाऊ भोसले, महापालिका गटनेत्या राखी जाधव, मनीष दुबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी -
ओखी नावाचे चक्रिवादळ मुंबईच्या किनाऱ्याजवळून निघून गेल्याने मुंबईवरचा धोका जरी टळला असला तरीही या चक्रिवादळाच्या परिणामांमुळे वातावरणात झालेल्या बदलाने मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नेमकी याच वेळी देशभरातून आंबेडकरी जनता मुंबईत पोहोचत होती. लाखो लोक तर दादर परिसरात दाखलही झाले होते. महापरिनिर्माण दिनानिमित्त चैत्यभुमी परिसरात लाखोंचा जनसमुदाय उसळतो, ही बाब ठावूक असतानाही महापालिका किंवा राज्य शासनाने योग्य नियोजन न केल्याने अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका भीमसैनिकांना बसला. पावसाला सुरूवात झाल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने उभारलेले मंडपही या पावसात जमिनदोस्त झाले. एकूणच कारण नसताना लोकांना त्रास सहन करावा लागला, याबद्दल प्रशासनाने भीमसैनिकांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom