
नवी दिल्ली - दूरसंचार नियामक ‘ट्राय’च्या मते गेल्या वर्षांमध्ये मोबाइल सेवा पुरवठादारांच्या अॉपरेशन कॉस्टमध्ये मोठी घट झाली आहे. पोर्ट होणाऱ्या क्रमांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोर्टेबिलिटीच्या प्रत्येक व्यवहारासाठी जास्त किंमत मोजण्याची आवश्यकता नाही. यामुळे ‘ट्राय’ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी येणारा खर्च १९ रूपयांवरून चार रूपयांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी संबंधितांना २९ डिसेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
देशामध्ये मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध केल्यानंतर २०१४-१५ मध्ये ३.६८ कोटी क्रमांक पोर्ट करण्यात आले. २०१६-१७मध्ये ६.३६ कोटी क्रमांक पोर्ट करण्यात आले. गेल्या पाच वर्षांमध्ये पोर्टिंगची सुविधा घेतलेल्या ग्राहकांची संख्या पाहता २००९च्या तुलनेत किंमत घटल्याचे लक्षात आले आहे. पोर्टेबिलिटीची किंमत २०१६-१७च्या वार्षिक ताळेबंदाच्या आधारावर निर्धारित केल्यास ती चार रुपयांवर येईल, असेही ट्रायचे म्हणणे आहे.
