भीमा कोरेगाव परीसरात तणावानंतर संचारबंदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भीमा कोरेगाव परीसरात तणावानंतर संचारबंदी

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
छत्रपती संभाजी राजे यांच्यावर अंत्यसंस्कार ज्यांनी केले त्या गोविंद (गणपत) महार यांची वढू बु येथील समाधी उध्वस्त करण्यात आली. भीमा कोरेगाव लढाईला २०० वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद घेण्यात आली. भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करण्याच्या प्रकाराला हिंदू संघटना आणि पेशव्यांच्या वंशजांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली. भीम सैनिकांच्या गाड्यांची मोडतोड व जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत पोलिसांसह काही भीम सैनिक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर आणि हवेली परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्या आहेत. 

१ जानेवारी १८१८ या दिवशी ब्रिटीश सैन्याचा भाग असलेल्या महार रेजिमेन्टनं पेशव्यांच्या बलाढ्य आणि विशाल सैन्याचा पराभव केला होता. हा दिवस शौर्य दिन म्हणून पाळला जातो. भिमा नदीच्या काठावर ही लढाई झाली होती. या अभुतपुर्व यशाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी इथं विजयीस्तंभ उभारला. भीमा कोरेगाव लढाईच्या विजयाला २०० वर्षे झाली आहेत. त्या निमित्तानं विजयस्तंभावर शौर्यदिन साजरा करण्यात येतो. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या शनिवारवाड्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेला समस्त हिंदू आघाडी आणि पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर ही परिषद वादाच्या भोवऱ्याच सापडली होती. त्यानंतरही एल्गार परिषद संपन्न झाली. या परिषदेला भारीपचे प्रकाश आंबेडकर आणि नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणूकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करणारे जायंट किलर आमदार जिग्नेश मेवानी, रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, न्या. बी. जी. कोळसे पाटील, छत्तीसगडमधील मानवाधिकार कार्यकर्त्या सोनी सोरी आणि युवा नेता उमर खालिद उपस्थित होते.

भीमा कोरेगांवच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. यामुळे भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यास काही समुदायांचा विरोध आहे. भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देश आणि राज्यभरातून लाखो लोक येतात. आजही तिथं लाखोचा जमाव जमला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. याचवेळी काही लोक बाईकवर फिरून भीम सैनिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते तर काही लोक दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. अचानक दुपारच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात भीम सैनिकांच्या गाड्यांवर दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक भीम सैनिकांवर दगडफेक करून पळून जात होते. वढू गावातही हीच परिस्थिती होती. आपल्या सोबत माता भगिणी असल्याने भीम सैनिकांन प्रत्युत्तर देण्याचे टाळत होते. दरम्यान तासाभरातच हे लोण वढू व कोरेगाव आणि परिसरात पसरले. भीमा कोरेगाव परिसरातल्या कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे या गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले. भिमा कोरेगाव येथे अग्निशन दलाच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. त्यात अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले. दगडफेक करीत असलेल्यांना पकडायचे सोडून पोलिस लोकांना पांगविण्यासाठी लाठीचा वापर करीत असल्याने भीम सैनिकांना संतापाची लाट उसळली आहे.

शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका - 
या भागातला तणाव पाहता सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या. यामुळं परिस्थिती हाताबाहेर जावू शकली नाही. तणाव असलेला भागात बंद ठेवण्यात आलाय. लोकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages