'होळी'साठी झाडे तोडल्यास १ वर्षापर्यंत कारावास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2018

'होळी'साठी झाडे तोडल्यास १ वर्षापर्यंत कारावास


मुंबई । प्रतिनिधी - होळी सणाच्या निमित्ताने रस्त्याच्या कडेची व खाजगी आवारातील झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जातात. त्यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणावर याचा परिणाम होतो. त्यामुळे होळीच्या निमित्ताने झाडांची कत्तल होऊ म्हणून उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी 'होळी' सणाच्या अनुषंगाने अधिक सतर्क रहावे, तसेच अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करावी, असे आदेश महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी देखील पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतिकात्मक 'होळी' साजरी करावी, असेही आवाहन परदेशी यांनी यानिमित्ताने केले आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ मधील तरतूदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध असून या अपराधाकरिता कमीतकमी १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच यासाठी कमीतकमी रुपये १ हजार ते रुपये ५ हजार एवढा दंड होऊ देखील होऊ शकतो. हे लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अशा प्रकारची वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान खात्यातील उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहाय्यक (Horticulture Assistant) यांनी अधिक सतर्क रहावे व अधिक सजगपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आदेश उद्यान अधीक्षक परदेशी यांनी दिले आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरु करावी, असेही आदेश परदेशी यांनी विशेष परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS