‘कोस्टल रोडच्या दालनाला मुंबईकरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचा प्रचंड प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘कोस्टल रोडच्या दालनाला मुंबईकरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचा प्रचंड प्रतिसाद

Share This

मुंबई । प्रतिनिधी - राज्‍य सरकारच्‍या औद्योगिक विकास महामंडळातर्फे वांद्रे – कुर्ला संकुल येथे सुरु असलेल्‍या मॅग्‍नेटिक महाराष्‍ट्र या आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शनात बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई सागरी किनारा रस्‍ता प्रकल्‍प’ या विषयावर दालन उभारले आहे. हे दालन परदेशी गुंतवणूकदार, तज्ज्ञ व्‍यक्ति तसेच सर्वसामान्‍य मुंबईकरांसाठी मोठे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असून दालनाला मिळणाऱया वाढत्‍या प्रतिसादासह हे दालन आबालवृद्धांच्‍या गर्दीनेही फुलून गेले आहे.

महापालिकेच्‍या या दालनाला अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) डॉ. संजय मुखर्जी यांनी आज भेट देऊन दालनाची पाहणी केल्‍यानंतर संबंधित महापालिका अधिकाऱयांचे त्‍यांनी कौतुक केले. महापालिकेने उभारलेल्‍या या दालनास दररोज सुमारे २५००-३००० मुंबईकर नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्पोरेट जगतातील मान्‍यवर यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) डॉ. संजय मुखर्जी यांनी सदर प्रदर्शनाची पाहणी केली. सागरी किनारा मार्ग हा मुंबईसह महाराष्‍ट्रात होऊ घातलेल्‍या गुंतवणूकीस चालना देण्‍याचे महत्‍त्‍वपूर्ण काम करीत असल्‍याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले. येत्‍या ५ वर्षांत मुंबईचे रुप हे आमुलाग्रपणे पालटणारे असल्‍याचेही डॉ. मुखर्जी यांनी प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना सांगितले. डॉ. मुखर्जी यांनी मॅग्‍नेटिक महाराष्‍ट्रच्‍या इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर दालनातील इतर स्‍टॉलचीही पाहणी केली.

दक्षिण मुंबईतील प्रिन्‍सेस स्‍ट्रीट ते वरळी सी लिंक याला जोडणारा ०९.९८ किलोमीटरचा हा सागरी मार्गाचा पहिला टप्‍पा असून या मार्गावर प्रत्‍येकी ३.४५ किलोमीटरचा एक याप्रमाणे दोन बोगदे उभारण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच ९० हेक्‍टरवर भरणी करण्‍यात येऊन हा संपूर्ण परिसर हिरवा ठेवण्‍यात येणार आहे. या सागरी मार्गावर सायकल ट्रॅक, उद्यान, मल्‍टीस्‍टोअर कार पार्किंग तसेच बी. आर. टी. एस. बस डेपोची उभारणी करण्‍यात येणार आहे. या मार्गामुळे ७० टक्‍के वेळेची बचत व ३४ टक्‍के इंधनाची बचत होणार आहे. हा मार्ग सिग्‍नलमुक्‍त व टोलमुक्‍त राहणार असल्‍याने मुंबईच्‍या पश्चिम भागाची वाहतुककोंडीतून मुक्‍तता होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages