मुंबई महापालिकेतील बोगस अभियंत्यांच्या चौकशीकडे दुर्लक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2018

मुंबई महापालिकेतील बोगस अभियंत्यांच्या चौकशीकडे दुर्लक्ष


बोगस डिग्री प्रकारणाची सीआयडी चौकशीची मागणी -
मुंबई । अजेयकुमार जाधव -
मुंबई महापालिकेत रस्ते, नाले सफाई, कर्मचारी विमा घोटाळा यासारखे घोटाळे समोर आले आहेत. हे घोटाळे ताजे असतानाच पालिकेच्या सेवेत असलेले काही काही अभियंते बोगस डिग्री मिळवून नोकरीस लागल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांकडे तक्रार करूनही चौकशी केली जात नसल्याने पालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकारी या बोगस अभियंत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी गायकवाड यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विरोधी पक्ष नेते विधानसभा, विधानपरिषद यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेत विविध घोटाळे होत असल्याने पालिकेचे अभियंते कोणते शिक्षण घेतात याची आरटीआय मधून माहिती मिळवताना काही अभियंते बोगस डिग्री घेऊन अभियंत्यांची नोकरी करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिकेच्या सेवेत चतुर्थश्रेणीत काम करणाऱ्या आठवी दहावी नापास असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी पालिकेत दररोज हजेरी लावताना राजस्थानच्या एका विद्यापीठाकडून इंजिनियरिंगचा डिप्लोमा मिळवला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमधील विद्यापीठ मानद (डीम्ड) विद्यापीठ आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या विद्यापीठातून शिक्षण घेण्यासाठी किंवा परिक्षा देण्यासाठी पालिकेची परवानगी घेतली होती का ? अशी माहिती मागितली असता याबाबतची माहिती पालिकेने दिली नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पालिकेच्या नोकरीतील आठवी नापास आणि दहावी नापास असलेल्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रमाणपत्रावर अभियंत्यांची नोकरी मिळवली असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी गायकवाड यांनी पालिका आयुक्तांना ५ एप्रिल, १३ एप्रिल तसेच १९ मे ला पत्र दिले होते. आयुक्तांना पत्र देऊन एक वर्षाचा काळ उलटला तरी अद्याप चौकशी केली जात नसल्याने मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विरोधी पक्ष नेते विधानसभा, विधानपरिषद यांना पत्र देऊन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात सर्व पुराव्यासहित लेखी तक्रार दिली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील अशाच एका प्रकरणात बोगस डिग्री घेणाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्याच प्रमाणे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.

Post Bottom Ad