मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत पावसाळ्यात अनेक आजार पसरत असतात. विशेष करून डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरतात. त्यातच मुंबईत सतत वाढणारी बांधकामे, झोपडपट्टी भागात डेंग्यू, मलेरीया डासांचा प्रादुर्भाव होतो. आजारांचे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेने धुम्र फवारणीचे काम सहकारी व बेरोजगार संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका तब्बल १८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत लेप्टो, डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य रोगांचा फैलाव होतो. पावसाळा व हिवाळ्यात या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते. हे प्रमाण रोखण्यासाठी पालिका धुम्र फवारणी, जनजागृतीबरोबरच विविध उपाययोजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, झाेपडपट्ट्या, सोसायट्या व सातत्यांनी वाढणारी बांधकामांमुळे यात भर भरते. त्यामुळे किटकजन्य रोगांची उत्पत्तीस्थाने शोधून तेथे धुम्र व किटकनाशक फवारणी केली जात आहे. पालिकेमार्फत हे काम केले जाते, मात्र यंदा धुम्र व किटकनाशक फवारणीचे काम खासगी सहकारी व बरोजगार संस्थांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ए ते टी विभागाकरिता हे काम दिले जाणार आहे. यासाठी अटी व शर्ती घालण्यात आल्या असून यावर १८ कोटी २२ लाख ५४६ रुपये खर्च केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.