मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात "आयुर्वेद संशोधन केंद्र" सुरु करण्यात येणार आहे. औषधीय उत्पादनांचे आणि सूत्रांचे मानवीय जीवनावर होणारे परिणाम तसेच रुग्णावर होणारा परिणाम यावरील बहुविध संशोधन या प्रयोगशाळेत केले जाणार आहेत. हे केंद्र पूर्णतः वातानुकूलित असणार आहे. हे केंद्र सुरू केल्यावर अत्याधुनिक जीवशास्त्रीय संशोधनामुळे उपचारांचा खर्च लक्षणीय कमी होणार आहे.
आयुर्वेद संशोधन केंद्रातील औषधशास्त्र विभागात ऋणदाब असलेली वातानुकूलित प्रमाणित प्रयोगशाळा आणि निर्जंतुक (स्वच्छ) प्रयोगशाळा अशा २ प्रयोगशाळा बनवणे गरजेचे आहे. या कामांसाठी २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हृदयरोग, कर्करोग, दमा, मधुमेह, मानसिक विकार या गैरसंसर्गजन्य रोगांसंदर्भातील आण्विक जीवशास्त्रीय संशोधन व अभ्यासाकरिता प्रमाणित ऋण दाब असलेली वातानुकूलित शाळा प्रस्थापित करुन या प्रयोगशाळेत विविध अत्याधुनिक वैद्यकीय, आण्विक, जीवशास्त्रीय चाचण्या घेण्यात येऊन त्यावर संशोधनाचे काम होणार आहे. जेणेकरून या रोगावर परवडणारे खर्च प्रभावी आणि व्यवहार्य असे परवडणारे असतील व रुग्णांना योग्य औषधोपचार करून रुग्ण लवकर बरे होतील. निर्जंतुक उती संस्कारीत प्रयोगशाळेत औषध निर्माण शास्त्रामधील विविध औषदीय उत्पादनांचे आणि सूत्रांचे विविध पेशी उतीवर होणा-या परिणामांचे इनाविट्रो त्यांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. त्यांची परिणामकारकता मोजण्यासाठी अत्याधुनिक अशी वातानुकूलित प्रयोगशाळा उभारण्याची योजना आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ९६ लाख ८७ हजार ९०६ रुपये खर्च करण्यात येणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.