
मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. त्याच प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या सायन (लोकमान्य टिळक) रुग्णालयात मांजरांमुळे रुग्णांना व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाल्याने मांजरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
मुंबईत कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना रात्रीचे ये जा करणे मुश्किल झाले आहे. रात्री ये जा करताना कुत्रे अंगावर येणे मागे लागणे यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईकर नागरिक कुत्र्यांमुळे एकीकडे त्रस्त असताना आता पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना मांजरीचा सामना करावा लागत आहे. मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी सायन हे प्रमुख रुग्णालय आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरील रुग्णांसाठी हे रुग्णालय सोयीस्कर पडत असल्याने या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त असते. या रुग्णालयात उपचारासाठी भरती झालेल्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. याचा फायदा उचलत रुग्णालयात मांजरिंना प्रवेश मिळत असतो. रुग्णालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्यानेही मांजरांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालय परिसरात मांजरांचा सर्वत्र संचार असून मांजरांच्या आपसात होणाऱ्या मारामाऱ्यादरम्यान रुग्णांना इजा होण्याची शक्यता आहे. मांजरांची भीती रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स व इतर कर्मचाऱ्यांनीही व्यक्त केली असून मांजरांचा त्वरित बँडबोस्त करावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान याबाबत रुग्णालयाच्या डीन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकलेला नाही.
