विकासाच्या नावाने झाडांच्या कत्तलीला शिवसेनेचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 March 2018

विकासाच्या नावाने झाडांच्या कत्तलीला शिवसेनेचा विरोध


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरु आहे. मुंबईतील झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याने विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. या विरोधामुळे मुंबईतील तब्बल ११०० झाडे तोडण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आले. २५ झाडे तोडण्याची परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना दिल्यामुळेच प्रशासनाची ही मनमानी सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाने ‘मेट्रो’सह रस्ता-नाला रुंदीकरण, नवीन रस्ते आणि विविध बांधकामांसाठी झाडे तोडण्यास २१ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध घातले होते. दरम्यान पालिकेने तब्बल ३०७० झाडे तोडण्याचे १२ प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या मागच्या मिटिंगमध्ये आणले होते. यावेळीही शिवसेनेच्या विरोधामुळे हे सर्व प्रस्ताव परत पाठवण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा ११०० झाडे तोडण्याचे चार प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आले. मात्र विकासाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल करू देणार नाही, अशी भूमिका मांडून हे प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली.

पुनर्रोपणाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालिकेच्या हद्दीतील झाडांची पाहणी वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य करीत होते. मात्र आता या पाहणीवर बंदी का आणली असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेचा विकासाला विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा र्‍हास करून विकास केला जात असेल तर शिवसेना विरोधच करेल असे ते म्हणाले. गेल्या १० महिन्यांत किती झाडे आयुक्तांनी मनमानीपणे आपल्या अधिकारात किती झाडे तोडली, किती झाडांचे पुनर्रोपण झाले याची माहिती सादर करा अशी मागणीही त्यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत केली.

Post Bottom Ad

JPN NEWS