
पालिका आयुक्त स्वतः करणार कामाची पाहणी -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई होऊ नये हणून पाणी साचणाऱ्या ठिकाणांमध्ये व्हावी म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणावरील पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा म्हणून विविध पर्याय राबवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आपण स्वतः या कामांची पाहणी करणार असल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी या बैठकीत सांगितले.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे कमी व्हावीत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. वर्ष २०१७ च्या पावसाळ्यात १५५ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे आढळून आले होते. या ठिकाणी पाण्याचा निचरा अधिक जलदगतीने व्हावा, यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी आधारित उपाययोजनांसह विविध पर्याय राबविण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर सादरीकरण व चर्चा पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीदरम्यान करण्यात आले. तसेच महापालिका आयुक्तांनी याबाबत सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी विविध स्तरीय उपाययोजना राबविल्यामुळे येत्या पावसाळ्यात १५५ पैकी ५५ ठिकाणी पाण्याचा अधिक जलदगतीने निचरा होईल असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाणी साचण्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांबाबत सहाय्यक आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व संबंधित अतिरिक्त आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे आढावा घ्यावा व तसेच सदर ठिकाणी स्वत:भेटी द्याव्यात, असे आदेश बैठकीदरम्यान देण्यात आले. पाणी साचण्याच्या सदर ५५ ठिकाणी महापालिका आयुक्तही समक्ष भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतील, असेही बैठकीदरम्यान सूचित करण्यात आले. पाण्याचा अधिक जलद गतीने निचरा होण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी 'पंप' बसविण्यात येतात. याबाबत देखील सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील पंप बसविण्याच्या जागांची पाहणी करुन व आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित खात्याला कळवावे, असेही आदेश बैठकीदरम्यान देण्यात आले.
शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीनेच वृक्ष छाटणी -
पावसाळ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून महापालिकेद्वारे 'वृक्ष छाटणी' केली जाते. झाडाची छाटणी करताना काही कंत्राटदार अयोग्य पद्धतीने छाटणी करत असल्याचे व त्याचे नकारात्मक परिणाम झाडांच्या संतुलनावर व झाडांशी संबंधित इतर बाबींवर होत असल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. सदर बाब लक्षात घेऊन वृक्ष छाटणी करताना ती शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीनेच योग्य प्रकारे व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश बैठकी दरम्यान देण्यात आले.
रात्री देखील अग्निसुरक्षा विषयक तपासणी -
रात्री देखील अग्निसुरक्षा विषयक तपासणी -
उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे इत्यादी ठिकाणी अग्निसुरक्षा विषयक बाबींची परिपूर्ण अंमलबजावणी होत असल्याची तपासणी नियमितपणे व काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधितांनी आवश्यक ते बदल करावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना, नोटीस यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नोटीस देऊनही त्रुटींची प्रतिपूर्ती झाली नसल्याचे लक्षात आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. अग्निसुरक्षा विषयक तपासणी ही काळाच्या गरजेनुसार रात्री देखील होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन यातील कायदेशीर व तांत्रीक अडचणींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र -
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र -
काही दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते, जागा मोकळ्या झाल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी पुन्हा अनधिकृत फेरीवाले दिसू लागल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.