मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेकडून शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतच्या कामासाठी दोन पॅकेजसाठी दोन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमले जाणार आहेत. त्यासाठी १०८ कोटी १४ लाख ४० हजार १५३ रुपये खर्च केले जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर नरिमन पॉईंट ते मालाड मार्वे पर्यंत ३५ किलोमीटरचा कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी किनारपट्टीलगत काही भागात भराव टाकून रस्ता बांधणे, काही भागात पूल आणि उन्नत मार्ग तर काही भागात बोगदे बांधण्यात येणार आहेत. कोस्टल रोडचा प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी स्टूप कन्सलटंट, ई अँड वाय या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली होती. त्यांनी विस्तृत प्रकल्प अहवाल सादर केलेला आहे. या विस्तृत प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी मे. फ्रिशमन प्रभु या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सल्लागारांनी सांगितल्यानुसार मसुदा अहवालामध्ये बदल करण्यात आले आहेत. कोस्टल रोडचे काम दोन पॅकेजमध्ये केले जाणार आहे. पॅकेज एकमध्ये प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि पॅकेज दोनमध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडचे टोक असे काम केले जाणार आहे. पॅकेज एकसाठी ५० कोटी ५२ लाख ८० हजार १५३ रुपये खर्च करून मे. लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा. लि. तर पॅकेज दोनसाठी ५७ कोटी ६१ लाख ६० हजार रुपये खर्च करून मे. इजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनिअर्स, मे. कलिन ग्रुमिट आणि रो (युके) लि. या कंत्राटदार कंपनीला दिले जाणार आहे.