मुंबई । प्रतिनिधी - भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात २.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यन्वित केला जाणार आहे. आज (बुधवार) पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याने दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात ५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा व पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जलविभागाने केले आहे.
पालिका विविध जलशुद्धीकरण प्रकल्पांद्वारे जलशुद्धीकरण प्रक्रिया करुन मुंबईच्या नागरिकांना पाणीपुरवठा करते. यापैकी एक जलशुद्धीकरण प्रकल्प भांडुप संकुल येथे असून, सदर जलशुद्धीकरण केंद्रात २.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. या कामाअंतर्गत, जुन्या पंपींग स्टेशनमध्ये ३.३ के. व्ही. बस बार चा विस्तार करणे व २ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर बसविण्याचे काम बुधवारी (२८ मार्च) सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई शहरातील ए, सी, डी वार्ड, बी आणि ई विभागातील काही भाग, जी/दक्षिण व जी/उत्तर विभाग आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसरपर्यंत पाणी कपात लागू केली जाणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.