मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत वार्ड अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तसेच वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करावा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.
मुंबईत होणाऱ्या अनधिकृत बांधकामाकडे काँग्रेसचे नगरसेवक सुनील नरसाळे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. पालिका मुख्यालय असलेल्या "ए" विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत विभाग कार्यालयाकडे गेल्या तीन महिन्यापासून आपण पाठपुरावा करत आहोत. याची तक्रार वार्ड अधिकाऱ्यांकडेही केली. मात्र तक्रारींची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. याला समर्थन देताना विरोधी पक्षनेते रावी राजा म्हणाले की, अनधिकृत बांधकामांबाबत वार्ड अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही याबाबत कारवाई होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाचाही या अधिकाऱ्यावर वरदहस्त आहे, त्यामुळेच कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच सबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पालिकेच्या इमारत व कारखाने विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असून गरिबांची घरे तोडली जातात आणि श्रीमंतांना मात्र अभय दिले जाते, असा आरोप काँग्रेसचे सुफियान वणू यांनी केला. तसेच नगरसेवकांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या वार्ड अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वणू यांनी केली. कुर्ला येथील "एल" विभागात डोंगर पोखरून बेकायदेशीररित्या तीन ते चार मजली बांधकाम करण्यात आल्याचा गौप्यस्फोट सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी यावेळी केला. याबाबत तक्रार करूनही कारवाई झाली नाही. पावसाळ्यात डोंगर कोसळून दुर्घटना झाल्यास याला सदर विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असे सांगतानाच या भागात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
No comments:
Post a Comment