विक्रमी मालमत्ता कर वसूली करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 April 2018

विक्रमी मालमत्ता कर वसूली करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्याने प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीवर भर दिला आहे. २०१७-१८ मध्ये महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कर वसुलीचा 5 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी तब्बल रुपये 5 हजार 132 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही वसुली करणाऱ्या करनिर्धारण व संकलन खात्यामधील उप करनिर्धारक व संकलक प्रल्हाद कलकोटी व अरविंद चव्हाण या दोन अधिकाऱ्यांचा 'एप्रिल 2018' चे ऑफिसर ऑफ द मंथ म्हणून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेला जकात करामधून 7 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाल्याने जकात कर रद्द झाला आहे. जकात कर बंद झाल्याने पालिकेला या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. जकात बंद झाल्यावर पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कराची वसुली करण्यावर प्रशासनाने जोर दिला आहे. 2017-18 मध्ये महापालिकेच्या करनिरर्धारण व संकलन खात्याला 5 हजार 402 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत केवळ 2 हजार 88 कोटी एवढीच रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली होती. डिसेंबर 2017 अखेरपर्यंत 3 हजार 66 कोटी, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत 3 हजार 746 कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्यानंतरच्या केवळ एका महिन्यात, म्हणजेच फक्त मार्च महिन्यात 1 हजार 386 कोटी रुपये मालमत्ता-करा पोटी जमा झाले. यानुसार वर्षभरात तब्बल 5 हजार 132 कोटी व 75 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. जे गेल्या वर्षीच्या मालमत्ता कर वसुलीपेक्षा 285 कोटींनी अधिक आहेत. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 4 हजार 847 कोटी रुपये एवढी मालमत्ता कर वसुली झाली होती. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलक) देवीदास क्षीरसागर यांच्या नेतृत्वात करनिर्धारण व संकलन खात्याने केलेले प्रयत्न, मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणा-यांवर केलेली कारवाई यामुळे कराची वसुली मोठ्या प्रमाण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad