मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या मुखपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या विशेष अंकात डॉ. आंबेडकर यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लहानपणीचा फोटो छापल्याने सरकारची खिल्ली उडवली जात आहे.
महाराष्ट्र सरकारचं "लोकराज्य" मासिक हे मुखपत्र आहे. हे मासिक माहिती व जनसंपर्क विभागाकडून चार भाषेत प्रसिद्ध केले जाते. या मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड' या नावाने प्रसिद्ध केली जाते. राज्य सरकारकडून नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेषांक काढण्यात आला. या विशेषांकाच्या 'महाराष्ट्र अहेड' या इंग्रजी आवृत्तीमध्ये भली मोठी चूक करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालपणाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा प्रकार समजताच राज्य सरकार तसेच माहिती व जनसंपर्क विभागाची खिल्ली उडवली जात आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सरकारला माहित नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारच्या प्रसिद्धीवर तसेच जाहिरातीवर केला जाणाऱ्या खर्चावरुन माहिती व जनसंपर्क विभाग याआधीही चर्चेत आला होता. आता राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या फोटोच्या गंभीर चुकीमुळे या विभागाचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान 'महाराष्ट्र अहेड' एका खासगी प्रकाशकाकडून छापण्यात येतं. यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. त्यांच्याकडून चुकीचा फोटो छापण्यात आला. ही चूक लक्षात येताच जनसंपर्क संचनालयाकडून या अंकाचं प्रकाशन आणि वितरण थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत चुकीची माहिती जाणार नाही, असा दावा विभागाने केला आहे.
No comments:
Post a Comment