मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून शहरात अनेक विकास कामे केली जातात. त्यापैकी काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रारी केल्यावर कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्याविरोधात उपोषण केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते आनंद पारगांवकर यांनी दिली.
मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या विकासकामातील ४८ प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. यात नाले गटार काम, पवई फिल्टर पाडा येथील स्काऊट गाईड स्थळाचे नुतणीकरण, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, उद्यान, पुलांचे बांधकाम, स्मशान भूमी याच समावेश आहे. याबाबत पालिकेच्या विविध विभाग कार्यालयाकडून माहिती मागवून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारी दाखल करुनही कंत्राटदारांवर कारवाई केली जात नाही. स्थानिक अधिकरी कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघटनेच्यावतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणादरम्यान ४८ प्रकारांची चौकशी करावी, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, कंत्राटदारांचे बिल व अनामत रक्कम थांबवावी, या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी. दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा नोंदवावा अशा मागण्या पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आनंद पारगांवकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment