वर्षभरात पेट्रोल ९, तर डिझेल ७ रुपयांनी महागले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वर्षभरात पेट्रोल ९, तर डिझेल ७ रुपयांनी महागले

Share This

मुंबई - १ एप्रिल पासून सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षात विविध करांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना महागाईचा फटका बसत असतानाच आता इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७३ रुपये ७३ पैशांवर पोहोचले, तर डिझेलचे दर ६४ रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईतही पेट्रोलच्या दराने ८१ रुपयांचा तर डिझेलच्या दराने ६८ रुपयांचा पल्ला ओलांडला आहे. वर्षभरात पेट्रोल ९ तर डिझेल ७ रुपयांनी महागले असून चार वर्षांतील हा आकडा सर्वाधिक आहे. परिणामी येत्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे देखील दर वाढण्याची शक्यता असल्याने महागाई आणखी वाढण्याची चिन्हे आहे. .

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोल व डिझेलच्या दरात १८ पैशांनी वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे ७३.७३ रुपयांवर पोहोचले आहेत. १४ सप्टेंबर २०१४ नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा उच्चांक आहे. १४ सप्टेंबर २०१४ रोजी पेट्रोलच्या दराने ७६ रुपये ०६ पैशांचा पल्ला गाठला होता, तर फेब्रुवारी २०१८ नंतर डिझेलच्या दराने गाठलेला हा नवा पल्ला आहे. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीत डिझेलचे दर लिटरमागे ६४ रुपये २२ पैसे इतके होते. आता हे दर हेच दर ६४ रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईतही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. मुंबईत रविवारी पेट्रोलचे दर लिटरमागे ८१ रुपये ५९ पैसे इतके असून डिझेलचे दर ६८ रुपये ७७ पैशांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी वाढ झाली आहे. १ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ७२ रुपये ६६ पैसे तर डिझेलचे दर ६१ रुपये २७ पैसे इतके होते. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages