मुंबई । प्रतिनिधी - भायखळा राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे. या नाट्यगृहातील आवाजामुळे राणीबागेतील प्राण्यांना त्रास होत असल्याने नाट्यगृह मागील ३० ते ३५ वर्ष बंद ठेवण्यात आले आहे. राणीबागेच्या विकासाचे काम सुरु असून त्या कामाबरोबर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचे कामही हाती घेतले जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात येते होते. मात्र गेल्या काही वर्षात नाट्यगृहाचे काम सुरु न झाल्याने नाट्यगृह नेमके कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने नाट्यगृह उभारणीसाठी सल्लागार नेमून १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत बोरीबंदर येथे रंगभवन, वांद्रे येथे बालगंधर्व, शिवडी येथे प्रबोधनकार ठाकरे ओपन थिएटर आणि भायखळा राणीबाग येथे अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे. या नाट्यगृहांपैकी रंगभवन, बालगंधर्व, प्रबोधन ठाकरे ओपन थियेटर महापलिकने बंदिस्त केली आहेत. मात्र भायखळा येथील आणाभाऊ साठे नाट्यगृह गेल्या ३० ते ३५ वर्षात बंदिस्त करण्यात पालिकेला अपयश आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने १९६३ मध्ये ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाटयगृह महापालिकेने सुरु केले. येथे मराठी लोककला सादर केली जात असे. यामध्ये लावणी, भारुड आदी लोककलेचा समावेश होता. नाट्यगृहात आवाजाने राणी बागेतील प्राणी भीत असल्याने १९८४ साली हे खुले नाटयगृह बंद करण्यात आले. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा वापर होत नसल्याने दुरवस्था झाली. पालिकेने अखेर हे खुले नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊन एक मजली बंदिस्त नवीन नाट्यगृह बांधण्याचे ठरविले आहे. मूळचे ४०० ते ५०० आसनव्यवस्था असलेले हे थिएटर ७८० आसनाचे बनवले जाणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
सन २००३मध्ये नाट्यगृहासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेत पालिकेच्या झालेल्या बैठकीत एकूण १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सरकारने या खर्चातील निम्मे म्हणजे ६ कोटी २४ लाखाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. बांधकाम सुरू करण्यापूर्वी ३ कोटी रुपये निधी देण्याचे सरकारने मान्य केले होते. खर्चाबाबत पालिकेने समाज कल्याण विभागाचे अधिकारी व प्रादेशिक उपायुक्तांना प्रस्ताव पाठवला. मात्र, मंजूर केलेला खर्च देण्यास सरकारने टाळाटाळ केली. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अर्धा खर्च द्यावा अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते धनंजय पिसाळ यांनी लावून धरली होती. त्यानंतरही राज्य सरकारने अर्धा खर्च देण्यास नकार दिल्याने अखेरीस नाट्यगृहाचा सर्व २० कोटी रुपये खर्च पालिकेने करण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृह उभारण्यापूर्वी सल्लागार नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सल्लागार म्हणून मेसर्स इपीकाँन कन्सल्टंट प्रा. लि.ची नेमणूक केली जाणार असून या कामासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.