मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने २००० नंतरच्या झोपडीधारकांना जलजोडण्या दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही अनेक झोपडीधारकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा केला जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्ते, वाहतूक-पूल, पर्जन्य जल वाहिन्या, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा, घनकचरा व्यवस्थापनासह अनेक दर्जेदार सुविधा मुंबईकरांना देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावून मुंबईकरांना अपेक्षित असणारा विकास करू असे जाधव यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यावर अध्यक्ष म्हणून भाषण करताना, उंच भागावर राहणाऱ्या मुंबईकरांसाठी पाण्याच्या टाक्या व बुस्टर पंपाची व्यवस्था करावी तसेच दारुखाना येथील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी लवकर प्रयत्न करावेत अशा सूचना जाधव यांनी केल्या. मुंबईत मलवाहिन्यांची व्यवस्था नसल्याने घरघरात शौचालय या योजना फसली. त्यामुळे घरघरात बायोटॉयलेट उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना जाधव प्रशासनाला केल्या. करनिर्धारण व संकलन व्यवस्था, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा, रस्ते वाहतूक व पूल, वाहनतळ, स्मशान भूमीचे पीएनजी स्मशानभूमित रुपांतर, कोस्टर रोड, गोरेगांव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा, कचऱ्याचे वर्गीकरण, उद्याने, क्रीडांगणे आणि मनोरंजन मैदानांत जास्तीत जास्त जागा, व उद्यानांच्या परिरक्षणावर भर दिला जाईल. मंड्याचा विकास, दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि पुनर्विकास कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हाऊस गल्ल्यांना पारदर्शक दरवाजे बसविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जाधव यांनी स्पष्ट केले. सन १९९७, २००० मध्ये यशवंत जाधव नगरसेवक निवडून आले. स्थापत्य, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पद भूषवले आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभागृह नेते पद मिळाले. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड त्यांची निवड करण्यात आली. यशोधर फणसे यांच्यानंतर जाधव यांनी सभागृह नेते पदावरुन स्थायी समिती अध्यक्ष पदाची पंरपरा कायम राखली आहे. जाधव यांच्या निवडीमुळे शहराला तब्बल १५ वर्षानंतर स्थायी समिती अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.