मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. आज (शुक्रवारी 6 एप्रिलला) या प्रभागात मतदान होत असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सायन प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र काही कालावधीत त्यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने रामदास कांबळे व संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक ठोंबरे यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शिवसेनेने ठोंबरे यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. ठोंबरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी, ठोंबरे यांना मानणारे शिवसैनिक कमालीचे नाराज आहेत. त्यात काँग्रेसने शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी देऊन, शिवसेनेची मते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग २१ मधील भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक 173 मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाने या प्रभागात आपला उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे, काँग्रेसचे सुनील शेट्ये व अपक्ष असलेले गौतम झेंडे आपले नशीब आजमावत आहेत. याठिकाणी 24 मतदान केंद्रावर 32 हजार 851 मतदार मतदान करणार आहेत. यात 17 हजार 566 पुरुष व 15 हजार 194 महिला मतदार आहेत. शनिवारी 7 एप्रिलला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.