मुंबई - मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये, असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे. या परिपत्रकावरून लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनातील वाद पेटण्याची शक्यता आहे. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी या परिपत्रकाला विरोध केला असून अशा प्रकारचे परिपत्रक काढताना समितीला विश्वासात घ्यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
शिक्षण विभागात सध्या बदल्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होतो. ओळख किंवा पत्राद्वारे प्रशासनावर दबाब आणला जातो. त्यामुळे बदल्यांच्या धोरणात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये. तसेच त्यांनी केलेल्या शिफारशी विचारात घेऊ नये, असे परिपत्रक प्रशासनाने नुकतेच काढले आहे. यावर शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर व समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेत हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारचे धोरणात्मक परिपत्रक काढताना प्रशासनाने शिक्षण समितीला विश्वासात घ्यावे, अशा सूचनाही सातमकर यांनी केल्या आहेत. दरम्यान, येत्या शिक्षण समिती बैठकीत यावरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.