आजपासून बेस्टची दरवाढ लागू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आजपासून बेस्टची दरवाढ लागू

Share This

मुंबई । प्रतिनिधी - महागाईची झळ सोसणाऱ्या मुंबईकर नागरिकांवर आजपासून बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुचवण्यात आलेल्या भाडेवाडीला स्थायी समिती, पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए)ची मंजुरी मिळाल्याने आज पासून नवी दरवाढ लागू झाली आहे. पहिल्या दोन टप्यापर्यंत कोणतीही दरवाढ होणार नसली तरी त्यांनतर एक रुपयापासून 11 रुपयांपर्यंतची दरवाढ लागू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही या दरवाढीचा फटका बसला आहे.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्ट गेल्या काही वर्षात आर्थिक संकटात सापडली आहे. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी कृती आरखडा बेस्टला दिला आहे. त्यात तिकीटांची दरवाढ सुचवली आहे. बेस्ट समितीने मंजुरी दिलेल्या दरवाढीनुसार पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसून त्यानंतर एक रुपयापासून 11 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. बेस्टच्या दैनंदिन बस पासमध्येही 70 ते 90 रुपयांची वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे. एसी बसच्या तिकीटांत किमान 5 रुपयांची वाढ झाली आहे. बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या बसच्या तिकीटांमध्येही वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीत व पालिका सभागृहात मंजूर झाला आहे. बेस्टची दरवाढ करताना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए)ची मंजुरीसाठी सादर करावा लागतो. तसा प्रस्ताव बेस्टने सादर केला होता. बुधवारी ट्रान्सपोर्ट अथाॅरिटीच्या बैठकीत या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गुरुवारपासून बेस्टची दरवाढ लागू करण्यात आली आहे. दैनंदिन बसपास शहरासाठी 50 रुपये, उपनगरासाठी 60 रुपये तर सर्वत्र मुंबईसाठी 90 रुपये असा असले. स्वातंत्र्य सैनिकांना, 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा आणि घरादरम्यान बेस्टची मोफत सेवा यापुढेही चालू राहणार आहे. जेष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतीच्या योजनेची अंमलबजावणी होई पर्यंत एसी बससेवा वगळता मासिक बसपासामध्ये 50 रुपये तर त्रैमासिक बसपासमध्ये 200 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान दैनंदिन बसपासमध्ये असलेली 50 टक्के सवलतीची आनंदयात्री योजना रद्द करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages