मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांपैकी स्थायी व शिक्षण या दोन समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव तर शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर यांची निवड झाली. जाधव व सातमकर यांच्या विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने त्यांच्या नावाची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी होती. पिठासन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट या महत्वाच्या चार वैधानिक समित्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी रीतसर अर्ज भरले होते. मात्र विरोधी पक्षाकडून व भाजपकडून एक ही अर्ज न आल्याने या निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. गुरुवारी स्थायी व शिक्षण समितीवर शिक्कामोर्तब झाले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आमदार तुकाराम काते, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, नगरसेवक रमेश कोरगावकर, अनंत नर, शुभदा गुडेकर, स्नेहल आंबेकर, यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, सर्व पक्षीय नगरसेवकांनी, बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघ, माजी महापौर महादेव देवळे, जनसंपर्क विभाग, सचिव आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.