मुंबई - बेस्ट उपक्रमातील बसमध्ये तिकीट वाटपासाठी ट्रायमॅक्स मशीनचा वापर केला जातो. या मशीनपैकी ६५ टक्के मशीन्स नादुरुस्त असल्याने ‘बेस्ट’ला रोज लाखो रुपयांचा फटका बसतो आहे. अशावेळी ट्रायमॅक्स कंपनी अत्याधुनिक नवीन मशीन्स द्यायला तयार असताना प्रशासन त्या घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करणा-या ‘बेस्ट’चा नुकसानीचा आकडा वाढतो आहे. याला जबाबदार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
‘बेस्ट’मध्ये २०१० पासून ‘ट्रायमॅक्स’ कंपनीच्या मशीनमधून तिकीट दिले जात आहे. २०१६ मध्ये हा करार वाढवण्यात आला आहे. मात्र ऐन गर्दीच्या वेळी या मशीनमध्ये बिघाड होत असल्यामुळे काही प्रवासी तिकीट न काढताच निघून जातात. यामुळे ‘बेस्ट’चे मोठे नुकसान होते आहे, मात्र असे असताना प्रशासन ‘ट्रायमॅक्स’कडून नव्या अत्याधुनिक मशीन घेत का नाही असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ, यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सुमारे चार हजार नव्या ट्रायमॅक्स यंत्रांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र सद्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ही यंत्रे परत पाठवली. बागडे यांनी आता नव्याने दुसर्या कंपनीकडून तिकीट मशीन्स खरेदीचा प्रस्ताव का आणला असा सवालही कोकिळ यांनी विचारला आहे. दरम्यान ‘ट्रायमॅक्स’ कंपनी नवीन सॉफ्टवेअर देण्यास व आवश्यक अत्याधुनिक सुविधा पुरवण्यास तयार आहेत. मात्र तरीही ‘बेस्ट’ प्रशासन याकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळेच बेस्टला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन निर्णय घ्यायला हवा, असे बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment