मुंबई - मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली गटविमा योजना जुलै महिन्यापासून बंद करण्यात आली आहे. विमा योजना लागू करावी म्हणून नगरसेवक सातत्याने मागणी करत असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस असे काही उत्तर दिले जात असल्याने नसल्याने काँग्रेस, राष्ट्र्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
महापालिका कर्मचाऱ्यांना २०१५ पासून लागू करण्यात आलेली गटविमा योजना जुलै २०१७ पासून बंद करण्यात आली. विमा कंपनी जास्त प्रिमियम मागत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. विमा योजना बंद असल्याने कर्मचाऱ्यांना जास्त पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी म्हणून मागील स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या राखी जाधव व समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी बैठक सुरु होताच हातात पोस्टर घेऊन आधी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य गटविम्याचा निर्णय घ्या नंतरच स्थायी समितीच्या बैठकीमधील इतर विषयांवर चर्चा करा अशी मागणी केली. जो पर्यंत गटविम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत उभे राहूनच समितीच्या कामकाजात भाग घेऊ, वाटल्यास आम्हाला साभागृहाबाहेर काढा असे आव्हान स्थायी समिती अध्यक्षांना दिले होते. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेसह भाजपाने पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले होते. यावर पुढील बैठकीत योजनेबाबतचा निर्णय सादर करू अशी माहिती देऊन प्राशसानाने वेळ मारून नेली होती. आज पुन्हा बैठक सुरु होताच विमा योजनेबाबत निर्णय जाहीर करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्र्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केली.
विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी प्रशासन उत्तर देण्यास समर्थ नसल्याने सभातहकुबी करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन करण्यास सांगितले. अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी विम्याचा प्रीमियमवरून वाद होता. आता कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून नवी योजना लागू केली जाणार आहे. त्याची फाईल वित्त विभागाकडे फाईल पाठवली आहे. लवकरच पालिका आयुक्तांची मंजुरी घेण्यात येईल असे सांगितले. यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. योजना बंद असलेल्या काळात कर्मचाऱ्यांच्या उपचारावर झालेला खर्च पालिकेने भरून द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. सदस्यांच्या मागणीवर प्रशासन ठोस उत्तर देत नसल्याने काँग्रसेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, आसिफ झकेरिया, कमलजहाँ सिद्दीकी, राष्टवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी सभात्याग केला. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांच्या रोषाला आम्हाला बळी पडावे लागत असल्याने पुढच्या बैठकीत निर्णय सादर करावा अशे आदेश दिले.
पहारेकरी व सत्ताधाऱ्यांची कोंडी -
कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेबाबत आम्ही विरोधकांच्या सोबत आहोत असे सांगणाऱ्या पहारेकरी म्हणून म्हणवणाऱ्या भाजपा आणि सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांना विरोधकांनी सभात्याग केला तेव्हा सभात्याग करता आला नाही. यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत हे भाजपाला आणि शिवसेनेला दाखवता आलेले नाही. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याने आम्हीही सभात्याग करू अशा बैठकीत घोषणा केल्या. मात्र विरोधकांनी सभात्याग करताना आमच्या सोबत सभात्याग करा असे आवाहन केल्यावर या नगरसेवकांना खाली मान घालून बसावे लागले. दरम्यान या विषयावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत व शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने शिवसेनेत काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती.
No comments:
Post a Comment