मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर्स- बीएलओ) 20 जून 2018 पर्यंत घरोघरी भेटी देऊन पडताळणी करणार आहेत. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या परंतु, अद्याप मतदार नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांची मतदार नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या भावी युवा मतदारांनाही सामावून घेतले जाणार आहे. तसेच दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. ही सर्व माहिती बीएलओ घरोघरी जाऊन जमा करणार आहेत. या मोहिमेदरम्यान छायाचित्र मतदार यादीमध्ये श्वेत-धवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) छायाचित्र असलेल्या मतदारांनी रंगीत छायाचित्र बीएलओंकडे जमा करावे.