Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ऐतिहासिक राजर्षी शाहू गौरव ग्रंथ शासनाकडून प्रकाशित


मुंबई - महाराष्ट्रातील थोर महापुरुष आणि त्यांच्या कार्याची ओळख महाराष्ट्रातील जनतेला व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून या थोर पुरुषांचे साहित्य राज्य शासन प्रकाशित करणार आहे,त्याच शृंखलेचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीने छायाचित्रासहित १३५० पानांचा ऐतिहासिक राजर्षी शाहू गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्ती, शिक्षक व विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू समजण्यास मदत होणार आहे. याच समितीमार्फत छत्रपती शाहू महाराजांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील ३७ भाषणांचा संग्रह प्रकाशित करण्याचे काम सुरु आहे.

राजर्षी शाहू छत्रपती शताब्दीनिमित्त ६२८ पाने अधिक १२ छायाचित्रे असलेला राजर्षि शाहू गौरव ग्रंथ १९७६ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रथमत: प्रसिद्ध केला होता. याच ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे काम राजर्षी शाहू चरित्रे साधने प्रकाशन समितीमार्फत जवळपास अडीच वर्षे सुरु होते. आता या ग्रंथाची १३५० पानांची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांचे समकालीन काही लेखक इतिहासकार, साहित्यिक, विचारवंतांनी यात आपले योगदान दिले असून महाराजांनी काढलेले आदेश, हुकूम, जाहीरनामे आणि शाहू महाराजांनी केलेले सामाजिक कायदे आणि शाहू छत्रपतींच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेगवेगळया ५ समित्या गठीत केल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती व महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यामार्फत तयार करण्यात आलेले वेगवेगळे खंड राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्यात येतात. तसचे सदर ग्रंथ सर्व विद्यापीठे-महाविद्यालये व शासकीय ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याने देशाला उपरोक्त नमूद थोर राष्ट्रीय पुरुषांच्या विचारांचा वारसा दिला असून, त्यांचे साहित्य, भाषणे, पत्रव्यवहार इत्यादिमुळे राज्यातील तरुण पिढीला व समाजाला दिशादर्शक ठरण्यास मदत होणार आहे.

थोर व्यक्तिमत्वांची माहिती नव्या पिढीला व्हावी, त्यांचे कार्य वाचकांसमोर पोहोचविण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. आज वाचकांबरोबरच इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना या चरित्र ग्रंथांचा नक्की फायदा होईल.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom