मुंबई - परळ येथे मुंबई महापालिकेचे केईएम रुग्णालय आहे. पालिकेच्या सर्वात मोठ्या रुग्णालयांमध्ये केईएमचा समावेश असला तरी त्यात हृदय प्रत्यारोपण केले जात नव्हते. यासाठी आता मान्यता मिळाल्याने तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होणार आहे. पालिकेच्या रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने गरजूंना दिलासा मिळणार आहे.
हृदय प्रत्यारोपणासाठी खाजगी रुग्णालयात येणारा खर्च सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा असतो. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण सर्वसामान्य व्यक्तींनाही परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे, यासाठी परळच्या केईएम रूग्णालयाने पुढाकार घेत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या परवानगीसाठी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केला होता. याला राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होणार आहे. काही पायाभूत सुविधा प्रत्यारोपणासाठी अत्यावश्यक असल्याने या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होतील. सध्या केईएम रुग्णालयात मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. पण आता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात जेणेकरून गरजू रुग्णांचे परवडणाऱ्या दरात प्रत्यारोपण होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
“हृदय प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र युनिट सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी अर्ज केल्यानंतर हृदय प्रत्यारोपणासाठी राज्य सरकारची परवानगीही मिळाली आहे. परंतु, हृदय शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असल्याने डॉक्टरांना प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालिका रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होतील. यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागेल, असे येथील एका वैद्यकीय अधिका-याने सांगितले. हृदय प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादीतील संख्या वाढते आहे. या तुलनेत अवयवदात्यांची संख्या अपुरी पडते आहे. शिवाय हृदय प्रत्यारोपणाचा खर्च खासगी रुग्णालयात २५ ते ३० लाख आहे. सर्वसामान्य गरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाल्यास ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.