मुंबई । जेपीएन न्यूज -
दादर शिवाजी पार्क येथे मेट्रोच्या कामामुळे शुक्रवारी रात्री मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान या कामासाठी लागणार खर्च मेट्रोकडून वसूल करणार आहे. त्यासाठी तशी नोटीस दिली जाईल अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली.
मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. असेच काम दादर शिवाजी पार्क परिसरात सुरू आहे. या कामा दरम्यान गोखले रोडखाली असलेली जलवाहिनी शुक्रवारी ८.३० वाजता फुटली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच जी उत्तर विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दुरुस्तीसाठी आले मात्र पाणी सोडण्याची ५ ते ९ वेळ संपत आली असल्याने नागरिकांना त्रास नको म्हणून पाणी पुरवठा बंद करण्यात आला नव्हता. रात्री ९ वाजता पाणी बंद करण्यात आले. या अर्धा तासात पाणी पुरवठा बंद न केल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेले आहे. रात्री एक वाजता या जलवाहिनीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. जल अभियंता विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी जल अभियंता विभागाचे अधिकारी येऊन या जलवाहिनीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर दुरुस्तीसाठी किती खर्च होणार आहे याचा अंदाज घेतला जाणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती मेट्रो प्रशासनाला दिली जाणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचा खर्च मेट्रोकडून वसूल करण्यात येईल अशी माहिती खैरनार यांनी दिली. दरम्यान पाणी सोडण्याची वेळ संपत आली असताना जलवाहिनी फुटली. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवला होता. जलवाहिनी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागलेली नाही. शनिवार सायंकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे खैरनार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment