मुंबई - गेल्या वर्षभरात झाडे कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर पालिकेने धोकदायक झाडांच्या जागी धोकादायक झाड असल्याचा फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. असे फलक लावून प्रश्न सुटणार नसल्याने अशी झाडे पालिकेने तोडावीत अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेच्या जागेवर धोकादायक व कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे व झाडांच्या फांद्या संबंधित विभागाकडून पाडल्या जातात. मात्र खासगी जागेत असलेली धोकादायक झाडे पाडणे अथवा छाटणी करण्यासाठी रहिवासी किंवा सोसायटीकडे साधनसामुग्री नसते. परिणामी पावसाळ्यात अशी धोकादायक झाडे पडण्याच्या दुर्घटना घडतात आणि जीवीतहानी व वित्तहानी होते. त्यामुळे खासगी जागेवरील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून पालिकेने झाडे तोडावीत व त्यासाठी सोसायटीकडून नाममात्र शुल्क आकारुन ती पाडावी. यामुळे भविष्यात होणारी जीवीतहानी व वित्तहानी टाळता येईल, असे राजा यांनी म्हटले आहे. दरम्यान, इमारत कोसळणे, छत कोसळणे, झाड उन्मळून पडणे अशा घटना पावसाळ्यात घडत असतात. अशा दुर्घटनांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक झाडांबाबत त्याच ठिकाणी फलकावर नागरिकांना इशारा देणारी माहिती लिहा, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
No comments:
Post a Comment