आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेने १ लाख ७१ हजार उंदीर मारले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2018

आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेने १ लाख ७१ हजार उंदीर मारले


मुंबई - पावसाळ्यादरम्यान मुंबईत लेप्टोस्पायरोसिस, प्लेग आणि रॅटबाईट फ्युअरसारखे आजार होतात. या आजारांना आळा घालण्यासाठी मागील पाच महिन्यांत १ लाख ७१ हजार उंदरांना पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून मारण्यात आले. यामध्ये पाणी साचणार्‍या ठिकाणची बिळे शोधून उंदीर मारण्यासाठी ‘विशेष मोहीम’ राबवण्यात आला. या धडक मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिका-याने दिली.

साथीचे आजार रोखण्यासाठी कीटकनाशक विभागामार्फत जानेवारीपासून उंदीर मारण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार २३ मेपर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीत १ लाख ७१ हजार ४९१ उंदीर मारण्यात आले. हे उंदीर मारल्यानंतर परळ येथील प्रयोगशाळेत आणले जातात. या उंदरांची प्लेग, लॅप्टोस्पायरोसिससाठी परीक्षण केल्यानंतर देवनार डंपिंग ग्राऊंडवर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. पाणी साचणार्‍या ठिकाणी असलेल्या बिळांतील उंदरांचे मल-मूत्र पाण्यात मिसळून लॅप्टोस्पायरोसिससारखे आजार होतात. त्यामुळे या ठिकाणची बिळे शोधून उंदीर मारण्यासाठी ‘स्पेशल प्रोग्राम’ राबवून ३८५ ठिकाणांवरून ३८६८ उंदीर मारण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारीनंतर नागरिकांना पिंजरे दिले जातात. पिंजर्‍यात अडकलेला उंदीर कीटकनाशक विभागाचा माणूस जाऊन कलेक्ट करतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय उंदरांना मारण्यासाठी विषारी गोळ्यांचा वापर केला जातो. तसेच बाटलीबंद सिल्फॉस गोळ्या बिळामध्ये टाकण्यात येतात. हवेशी संपर्क आल्यानंतर या गोळ्यांमधून निघणार्‍या फॉस्पिन नावाच्या गॅसच्या संपर्कात आल्यानंतर उंदराचा मृत्यू होतो. कर्मचारीही रात्र पाळीत काम करून उंदीर मारतात.

Post Bottom Ad