परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2018

परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - मुख्यमंत्री

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परवडणारी घरे या संकल्पातून देशातील प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी शासनाचे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचेच धोरण राहिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटिफाईड एरिया- नैना) अंतर्गत पनवेल येथील वाधवा समूहाच्या फर्स्ट इंटिग्रेटेड टाऊनशिप प्रकल्पांतर्गत वाईज सिटी या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वाधवा समूहाचे अध्यक्ष विजय वाधवा, नवीन माखिजा यांच्यासह समूहाशी निगडित संचालक, तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील विकासक आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परवडणाऱ्या घरांसाठी वाधवा समूहाने सुरु केलेला हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यातून अन्य विकासकही प्रेरणा घेतील. कर्जत-पनवेल या परिसराच्या विकासासाठी अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. या परिसरातील मल्टिमोडल कॅारिडॅारच्या विकासासाठी अमेरिकेच्या दौऱ्यात जागतिक बँकेकडे प्रस्तावित केले आहे. या परिसरात सामान्यांसाठी आवश्यक असे गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य सुविधा वेळेत पूर्ण होतील असे प्रयत्न आहेत.

स्मार्ट सिटीप्रमाणेच वाईज सिटी ही सर्व सुविधांनी युक्त संकुले वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. वाधवा समूहाचे अध्यक्ष वाधवा यांनी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सादरीकरणातून मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेच्या अनावरणाने वाईज सिटी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

Post Bottom Ad